नवी दिल्ली : फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईट्स सोमवारी रात्री ठप्प पडल्या होत्या. यामुळे भारतासह जगभरातील युजर्स त्रस्त झाले. तब्बल सहा तासाने या सोशल मीडिया साईट्स पूर्ववत झाल्या. याचा मोठा आर्थिक फटका फेसबुकचे मालक मार्क झुकेरबर्ग यांना बसला. झुकेरबर्ग यांचे तब्बल ५२ हजार कोटींचे नुकसान झाले. तसेच फेसबुकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
सोशल मीडिया साईट्स ‘डाऊन’ झाल्याची समस्या ‘फॉल्टी कॉन्फिग्रेश चेंज’मुळे निर्माण झाल्याने फेसबुकने ब्लॉगद्वारे सांगितले. यामागे कोणत्याही सायबर अॅटॅक किंवा हॅकिंगची शक्यता फेटाळून लावली. फेसबुक बंद झाल्याने झुकेरबर्ग ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये चौथ्या स्थानावरून पाचव्या क्रमांकावर आले. कंपनीचे शेअर्स ४.९ टक्क्यांनी घसरले. नोव्हेंबर २०२० नंतरची एका दिवसातील ही मोठी घसरण आहे. फेसबुकला महसुलात मोठे नुकसान झाले. डिजिटल अँड मॅनेजमेंट फर्म स्टँडर्ड मीडिया इंडेक्सनुसार, फेसबुकला दर तासाला ४.०६ कोटी रुपयांची हानी सोसावी लागली. मात्र हे नुकसान केवळ जाहिरातीमुळे झाले आहे. वेगवेगळ्या तज्ञांच्या मते, कंपनीला दर तासाला सुमारे ७.५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

ट्विटर आणि टिकटॉकसारख्या इतर कंपन्यांना फेसबुक बंद झाल्यामुळे फायदा झाला. फेसबुक ठप्प पडले असताना अन्य दिवसांच्या तुलनेत ट्विटर आणि टिकटॉकवर जास्त ट्रफिक दिसून आली. सहा महिन्यांपूर्वीही व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगभरात ४२ मिनिटे ठप्प झाले होते.
युजर्सला झालेल्या त्रासाबद्दल फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी मंगळवारी दिलगिरी व्यक्त केली. प्रियजनांशी कनेक्ट होण्यासाठी तुम्ही आमच्या सेवेवर किती विसंबून आहात, याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे आज जे व्हॉट्सअॅप वापरू शकले नाही, त्यांची क्षमा मागतो. व्हॉट्सअॅप सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही दाखवलेल्या संयमाबद्दल आभारी आहे, असे झुकेरबर्ग यांनी म्हटले.






