कर्जत ( प्रतिनिधी जयेश जाधव ) : एकदा वय झाल की ते जेष्ठ नागरिक अडचणीचा विषय ठरतात. अगदी स्वतःच्या घरातही त्यांची काय किंमत असते हे सुद्धा अनेकांनी अनुभवले आहे. अनेक जेष्ठ नागरिक एकटे पणाचे जीवन व्यथित करीत असतात. हल्ली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. निवृत्त जेष्ठ नागरिकांना पैशांच्या फसवणुकीची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी अतिशय संयम व सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. एकट्याने राहणाऱ्या वयस्कर जोडप्यांना खूप समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना आपलेपणा वाटावा म्हणून कर्जत पोलीस त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतील.’ असा शब्द कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी जेष्ठ नागरिकांना दिला.
कर्जत पोलीस ठाण्याच्या सभागृहात जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी कर्जत जेष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकारी व सदस्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले होते. यावेळी अध्यक्ष सुभाषचंद्र नातू, उपाध्यक्ष अच्युत कोडगिरे, सचिव कृष्णा लाड, माजी अध्यक्ष मोरेश्वर शहासने, मुकुंद मित्रगोत्री, सुरेश कुरतडकर आदी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीता आथणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कोडगिरे, शहासने, नातू या पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या कथन केल्या. शुक्रवारी बाजारपेठेत गर्दीत वाहने मोठ्या प्रमाणावर येत असल्याने त्रास होतो. त्याचा बंदोबस्त करावा. अशी या सर्वांची मागणी होती. मुकुंद भागवत यांनी नदी संवर्धनासाठी सहकार्य करण्याची सूचना केली.
पत्की यांनी, ‘पुढील वर्षी पासून जेष्ठ नागरिक दिन पोलीस ठाण्यात साजरा करण्यात येईल’ असे सांगून ‘दर महिन्याला सुसंवाद साधून वाढदिवस साजरे करण्याचा मानस’ त्यांनी बोलून दाखविला. अर्ध्या रात्री फोन केला तरी कोणत्याही मदतीसाठी आमचे पोलीस बांधव धावून येतील. तुम्ही मला भेटण्यासाठी कधीही या. त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही.’ असेही आवर्जून सांगितले. सुनीता आथणे यांनीही जेष्ठ नागरिकांशी सुसंवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.






