माय बाप जनता जनार्दनास खुले पत्र; आम्ही डॉक्टरकी करावी की ना करावी ?

बीड (सुमित निसर्गध) – लातूर येथे डॉ दिनेश वर्मा ह्यांच्यावर झालेला जिवघेणा हल्ला वर्णन करायला शब्दच नाहीत इतका भयानक आणी विकृत,कृतघ्न मनोवृत्तीच्या माणसाकडून झालाय.
डॉ च्या मानेवर व छातीवर धारदार चाकूने अनेक वार करण्यात आले आहेत. आधीच अत्यावस्थेत असलेली रुग्ण जी वयोवृद्ध तर होतीच पण त्याचबरोबर डायबेटिस व ब्लड प्रेशर सारख्या कोरोनासाठी खतरनाक साथीदार असलेल्या व्याधिंनीही ग्रस्त होती.उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्या रुग्णाचा मृत्यू झाला.ह्यात त्या डॉ ची काय चूक.असेच हल्ले पिंपरी येथे झालेत व इतरत्र ही होतीलच.रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न प्रत्येकवेळी यशस्वी होतीलच असे नाही.कुठलाही डॉ. पेशंट वाचवण्याचाच प्रयत्न करतो.डॉ हा जादुगार नाही. अगदी विवेकानंदांनीही सांगितले आहे की डॉ देव नाही आणी दानव ही नाही.वैद्यकीय शास्त्रालाही मर्यादा आहेत. सर्व सामान्य नागरिकांना कोरोना होतो तो त्यांच्या स्वतःच्या किंवा त्यांच्या जवळच्या लोकांच्या काळजी न घेतल्यामुळेे. तर असे हे आपल्या चुकीचे खापर ह्या नराधमाने डॉ वर फोडले आणी त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.काय म्हणणार ह्या वागण्याला?नेहेमीप्रमाणेच प्रशासन,राजकीय मंडळी,पत्रकार मंडळी आणी आपण सगळे सर्वसामान्य नागरिक गप्प बसणार.गरज सरो आणी वैद्य मरो ही तर आपली मूळ प्रवृत्ती आहेच.येथे तर स्वतःच्या आणी आपल्या कुटुंबियांच्या जिवावर उदार होवून रुग्नसेवा देणार्या डॉ वर प्राणघातक हल्ला होतोय.
कोरोनावर 100% खात्रीलायक औषध अगदी अमेरिकेतही उपलब्ध नाही.त्यामुळे रुग्णांची अवस्था पाहून त्यानुसार उपचार होतात.ज्या रुग्णांचे ओक्सिजन चे प्रमाण कमी होते त्यांनाच जास्त त्रास होतो.व्हँटीलेटर ज्याला आपले परमपुज्य आमिर खान व मेडियाने पैसे छपाइचे मशीन म्हणून खलनायक ठरविले होते तेच मशीन रुग्णाचा प्राण वाचवू शकते हे ही आता सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट झाले आहे. जगभरातच आय.सी.यू.मधील बेड व ओक्सिजन पुरवू शकणारे बेड ह्यांची संख्या अत्यल्प आहे हे भिषण सत्य मान्य केलेच पाहिजे.ह्या परिस्थितीला आपले सगळेच राजकीय पक्ष जबाबदार आहेत.कूठल्याही शासन काळात सरकारी दवाखाने व सरकारी वैद्यकीय महाविद्यालये वाढविण्याचा नियोजन बद्ध प्रयत्न झालेला नाही.आरोग्य सेवेचे खाजगीकरण करण्यातच आपली नेते मंडळी व सरकारी बाबू व्यस्त असतात त्यामागचे मलाईदार कारण सगळ्यांनाच माहिती असते.
अपुरे कर्मचारी,अपुरे डॉ,अपुरा औषध पुरवठा,रुग्ण सेवा करताना कोरोनाचा संसर्ग झाल्यास स्वतःची व कुटुंबियांची होणारी सामाजिक विटंबना,प्रचंड ताणामुळे होणारी प्रकृतीची ओढाताण ह्या इतक्या विषम परिस्थितीत काम करणार्या डॉ. वर असा अमानुष हल्ला झाला (ज्यात खरेतर त्याची काहिच चूक नाही) तर आम्ही डॉ. नी रुग्णसेवा का करावी?हा प्रश्न कोणाही नागरिकाला पडायला हवा. भारतातील वैद्यकीय सेवेबद्दल नेहेमीच सर्वसामान्य जनता,प्रशासन,मेडिया,राजकारणी हे दुजाभाव करीत असतात. आज वेळ आहे तुम्ही सगळ्यांनी आम्हा डॉ च्या पाठीशी उभे राहण्याची. मंडळी टाळ्या वाजवायला उचललेले हात आता डॉ वर हल्ला करणार्याचा हात पकडताना दिसले नाही तर आधीच खचलेली आम्ही मंडळी उध्वस्त होवू. आज परिस्थिती अशी आहे की आम्हापैकी बहुतांश मंडळींना आपल्या भावी पिढीला ह्या व्यवसायात घालायला भिती वाटतेय.तुम्ही लोक जर डॉ शी असे दुश्मनासारखे वागणार असाल तर मग अशा कृतघ्न समाजाची सेवा तरी का करावी? हा प्रश्न उभा राहतो. कोरोनाच्या काळात सर्वस्व झोकून देवून सेवा करणार्या डॉ वर जिवघेणा हल्ला होणारा व त्याला मूक साक्षीदार होणारा,जगातला एकमेव हा माझा सुसंस्कत (?) भारत देश आहे असे अत्यंत दुःखद व निराश मनाने म्हणावे लागते आहे.
माझी मायबाप जनतेकडून एकच अपेक्षा आहे,तुम्हाला जर खरच डॉ ची काळजी असेल (कमीत कमी तुमचे आरोग्य ठीक राखण्यासाठी तरी) तर डॉ वरील हल्ल्याचा निषेध तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना,ओळखीच्या पुढाऱ्यांना,वर्तमानपत्रांना कळवा.तुम्ही आमच्या पाठीशी आहात हे जाणवू द्या. हताश होवून हुशार डॉ नाईलाजाने परदेशी निघून गेले तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीस जबाबदार तुम्हीच असाल.
– डॉ अभिजित सायंबर एम डी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here