जालना (प्रतिनिधी) : जिल्ह्यात उपवासासाठी भगर खाल्ल्याने एकाच कुंटबातील सात वर्षाच्या मुलीसह सहा जणांना विषबाधा झाल्याची घटना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे घडली असून सर्वांवर वडीगोद्री येथे उपचार सुरू आहेत.
नवरात्रोत्सवानिमित्त अनेकजण भक्तीभावाने नऊ दिवस उपवास करतात. त्यात आज पहिली माळ असून अंतरवाली सराटी येथील तारक कुटुंबातील सदस्यांनीही उपवास ठेवला होता. उपवास असल्याने सकाळी ११ वाजता भगर खाऊन शेतात काम करायला गेले. दरम्यान आज दुपारी २.३० च्या सुमारास या सर्वांना शेतात मळमळ उल्टी, थरकाप तसेच थंडी वाजून त्रास होऊ लागला. त्यांची बिघडलेली प्रकृती पाहून शेजारीच असलेल्या योगेश तारख यांनी ज्ञानेश्वरी व कांताबाई तारख यांनी सोडता चौघांना बैलगाडीतून संभाजीनगर-बीड राष्ट्रीय महामार्गपर्यंत आणून नंतर वाहनांनी त्यांना वडीगोद्री येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कांताबाई एकनाथ तारख (५५), महादेव एकनाथ तारख (३४), जगन्नाथ एकनाथ तारख (२७), ज्योती महादेव तारख (३०), सिमा जगन्नाथ तारख (२२), ज्ञानेश्वरी जगन्नाथ तारख (७) यांना विषबाधा झाली आहे. यातील ज्योती तारख यांची तब्बेत खालावल्याने त्यांना अंबड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.






