प्रियांका गांधींनी पुन्हा हाती घेतला झाडू

लखनऊ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसैन) : सीतापूर गेस्ट हाऊसमध्ये प्रियांका गांधी यांना ठेवण्यात आल्यानंतर तिथे त्यांनी हातात झाडू घेऊन साफसफाई केल्याची छायाचित्र समोर आली होती. त्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा प्रियांका गांधींनी हातात झाडू घेतला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या लखीमपूर खेरी घटनेनंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची तयारी केली आणि पोलिसांनी त्यांना अडवलं. तेव्हापासून राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनी सातत्याने उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आता प्रियांका गांधी यांच्या हातातल्या झाडूवरून दोन्ही बाजूंनी टीका-टिप्पणी होताना दिसत आहे.

priyanka-in-sitapur-guest-house

लखीमपूर घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून सीतापूर इथल्या गेस्टहाऊसवर काही काळ ठेवलं. या काळात प्रियांका गांधींनी गेस्ट हाऊसमधली खोली झाडून स्वच्छ केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खोचक शब्दांत टीका करताना प्रियांका गांधींवर निशाणा साधला होता.

झाडू मारतानाचा प्रियांका गांधींचा फोटो व्हायरल होत असल्याबाबत योगी आदित्यनाथ यांना विचारणा केली असता ते म्हणाले, “काँग्रेस नेत्यांना तेवढंच करण्याच्या उपयोगाचं ठेवायची जनतेची इच्छा आहे. आणि तेच जनतेनं त्यांना करायला लावलं आहे. या लोकांना उपद्रव करणं आणि नकारात्मकता पसरवणं यापेक्षा दुसरं काम उरलेलं नाही.” योगी आदित्यनाथ यांच्या या विधानानंतर त्यावर राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here