पंजाब ( विशेष प्रतिनिधी ) : पंजाबच्या बठिंडा शहरात एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेवर ऑपरेशन थिएटरमध्ये सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेने रुग्णालयातील सहा कर्मचाऱ्यांनी सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
फाजिल्का जिल्ह्यातील महिला शस्त्रक्रियेसाठी बठिंडातील खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. रुग्णालयात 4 ऑक्टोबरला तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. तिथे तिला भूल देण्याचे इंजेक्शन देण्यात आले.
भूल देण्याचे इंजेक्शन दिल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्येच सहाजणांनी आपल्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी डॉक्टरांना कोणतीही माहिती नसल्याचे महिलेने सांगितले. या घटनेनंतर महिलेने डॉक्टरांना काहीही न सांगता रुग्णालय सोडले आणि जिल्हा रुग्णालयात दाखल होत पोलिसांना घटनेची माहिती दिली. महिलेच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.






