पोलिस उपनिरीक्षकाचा महिला पोलिस कॉन्स्टेबलवर बलात्कार; दोन पोलीस अधिकाऱ्यांना सीबीआयने केली अटक

दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : येथील मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षकाला आणि एका पुरुष सहायक पोलिस उपनिरीक्षकाला सीबीआयने अटक केली आहे. एका पोलिस उपनिरीक्षकाने एका महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या आरोपी पोलिस उपनिरीक्षकाकडून लाच घेताना सीबीआयने त्यांना अटक केली आहे. बलात्काराचे प्रकरण दाबण्यासाठी या अटक केलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपी पोलिस उपनिरीक्षकाकडून लाच मागितली होती, दिल्ली पोलिसांनीच याबाबतची माहिती दिली आहे.

मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये तैनात एक महिला पोलिस उपनिरीक्षक आणि एक पुरुष सहायक पोलिस उपनिरीक्षकाला सीबीआयच्या टीमने लाच घेताना अटक केली आहे. शनिवारी रात्री सीबीआयने त्यांना अटक केली. विशेष म्हणजे लाच घेतल्याप्रकरणी ज्या महिला पोलिस उपनिरीक्षकाला अटक केली गेली, तीच बलात्काराच्या प्रकरणाचा तपास करत होती, असं दिल्ली पोलिसांनी सांगितल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या ऑगस्टमध्ये दक्षिण जिल्ह्यातील हौज खास पोलिस स्टेशनमध्ये तैनात महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले. पीडित महिला कॉन्स्टेबलने विभागातील पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आरोप केला होता. पोलिस उपनिरीक्षक मनोज याने इमर्जन्सी ड्युटीदरम्यान तिला बोलावले. यानंतर तो तिला मुनीरका येथील एका घरात घेऊन गेला. तिथे तिला पिण्यासाठी कोल्ड्रींक दिले. ते कोल्ड्रींक प्यायल्यावर तिची शुद्ध हरपली. यानंतर पोलिस उपनिरीक्षकाने तिच्यावर बलात्कार केला आणि आक्षेपार्ह फोटोही काढले, असा आरोप पीडित महिला कॉन्स्टेबलने केला आहे.

एकीकडे, दिल्ली पोलिसातील पोलिस उपनिरीक्षकावर सहकारी महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. दुसरीकडे, या बलात्कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या महिला पोलिस उपनिरीक्षकाला हे बलात्काराचे प्रकरण दाबण्यासाठी आरोपी पोलिस अधिकाऱ्याकडून लाच घेताना अटक करण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणाने दिल्ली पोलिसांची नाचक्की झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here