भाडेकरूचा त्रास असह्य झाल्याने घरमालकाची गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर (उपसंपादक उमेश अबनलक) : जरीपटका येथील एका घरमालकाने भाडेकरूचा त्रास असह्य झाल्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गळफास लावण्यापूर्वी मृतकाने स्वत:चा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेमुळे शहरभर खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आत्महत्या करणारे घरमालक मुकेशकुमार श्रीचंद रिजवानी (वय ४६) जरीपटक्यातील कस्तुरबानगरात राहत होते. नास्ता सेंटर चालविणाऱ्या रिजवानी यांनी आरोपी राजेश उर्फ राजा नामोमल सेतिया (वय ४५) याला काही वर्षांपूर्वी दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या. मात्र, ठरल्याप्रमाणे आरोपी राजेश मुकेश यांना घरभाडे देत नव्हता. त्यांना घरभाड्याची मागणी केली असता तो शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. त्याचा मोठा भाऊ वेगवेगळ्या विभागात तक्रारी करून रिजवानी यांना त्रास देत होता.

वारंवार होत असलेल्या वादामुळे रिजवानी यांनी आरोपींना सप्टेंबर २०१९ मध्ये आपले घर खाली करून मागितले. यावेळी आरोपीने त्यांना घर खाली करून देण्यासाठी १० लाखांची खंडणी मागितली. रिजवानी यांनी आरोपी राजाला ६० हजार रुपये दिले. आणखी ४.५० लाख रुपये मिळावे म्हणून आरोपी राजा रिजवानी यांचा छळ करीत होता, तर राजाचा मोठा भाऊ मूलचंदही त्याला साथ देत होता. त्यांच्याकडून होणारा त्रास असह्य झाल्यामुळे ६ ऑक्टोबरला सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली.

तत्पूर्वी रिझवानींनी स्वत:चा व्हिडिओ बनविला. त्यात आत्महत्येला आरोपी सेतिया बंधू जबाबदार असल्याचे म्हटले. रिजवानी यांनी त्यात एका वकिलाचेही नाव घेतले. हा व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर कशिश सुनील रिजवानी यांनी शनिवारी रात्री जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी आरोपी सेतिया बंधूविरुद्ध गुन्हा दाखल केला. ते फरार असून, ठाणेदार वैभव जाधव आणि द्वितीय निरीक्षक तृप्ती सोनवणे तसेच त्यांचे सहकारी आरोपींचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here