मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : ऍण्टॉप हिल येथील एसीपी कार्यालयाजवळ मुंडके नसलेला व हात-पाय तोडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. हा गुन्हा अखेर मुंबई गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. एसीपींच्या गाडीवर ड्रायव्हर असलेल्या कॉन्स्टेबलनेच हे निघृण कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोपीने त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या अक्कलकोटच्या तरुणाचा अशा प्रकारे खून करून मृतदेह फेकला होता. कॉन्स्टेबलसह त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली असून कोर्टाने त्यांना १४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ऍण्टॉप हिलच्या सी.जी.एस. कॉलनीतील ९८ क्रमांक इमारतीजवळ ३० सप्टेंबरच्या सकाळी मुंडके नसलेला, हात-पाय तोडून बांधलेला व अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. शीव विभागाच्या एसीपींच्या कार्यालयाजवळच मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त गुन्हे शाखेची पथकेदेखील गुह्याचा कसून तपास करीत होते. अखेर गुन्हे शाखा युनीट-४च्या पथकाने या किचकट गुह्याची उकल केली. तांत्रिक बाबी, सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांच्या मदतीने शिताफीने तपास करीत हा निघृण गुन्हा करणाऱ्या आरोपीला शोधून काढले. आरोपी कोण हे समजले तेव्हा तपास करणारे पोलीसच हबकले, कारण हे अमानुष कृत्य करणारा आरोपी एसीपींच्या गाडीवर चालक असलेला कॉन्स्टेबल निघाला.
शिवशंकर गायकवाड (४५) असे त्याचे नाव असून त्याची पत्नी मोनिका गायकवाड (३५) हिलादेखील पोलिसांनी अटक केली आहे. मृत व्यक्तीचे नाव दादा जगदाळे (३८) असे असून तो अक्कलकोट येथील राहणारा आहे. विवाहित असलेल्या दादा आणि मोनिका यांचे अनैतिक संबंध होते. त्यातूनच शिवशंकरने त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. प्रभारी निरीक्षक इंद्रजित मोरे यांच्या नेतृत्वाखाली एपीआय अजय बिराजदार, गव्हाणे तसेच संदीप कांबळे, संदीप तळेकर, अजय बल्लाळ, साळोखे या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.






