औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : तिरुपती बालाजी देवस्थान दर्शनाचे बनावट पास देऊन ६१ जणांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला औरंगाबाद सायबर पोलिसांनी गारखेडा परिसरातून जेरबंद केले आहे. अटक केल्यानंतर आरोपीने त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी सांगितले आहे.
गारखेडा परिसरातील गजानन नगर, गारखेडा येथील आशिष नारायण गुणाले याने बिडकीन येथील गणेश चौधरी व त्यांच्यासोबत ६० जणांकडून प्रत्येकी ३०० रुपये घेतले. या सर्व प्रवाशांना तिरुपती बालाजीचे बनावट पास दिले. ते घेऊन ६१ जण १७ सप्टेंबर २०२१ रोजी तिरुपतीला पोहोचले. दर्शनाच्या रांगेत उभे असताना सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना पास मागितले. मात्र हे सर्व पास बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे या सर्वांनाच दर्शनाच्या रांगेतून बाहेर काढण्यात आले. या फसवेगिरीमुळे हे सर्व भाविक तिथून भगवान बालाजीच्या दर्शनाविनाच परतले.
या फसवणूकीच्या प्रकाराबाबत गणेश चौधरी यांनी ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक रवींद्र निकाळजे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, हवालदार रवींद्र लोखंडे, कैलास कामठे, संदीप वरपे, दत्ता तरटे आदींच्या पथकाने यासंबंधी तपास सुरु केला.
सायबर पोलिसांनी बारकाईने तांत्रिक पद्धतीने तपास करून बनावट पास देणाऱ्या आरोपीला म्हणजेच आशिष गुणाले याला अटक केली. सुरुवातीला पोलिसांनी चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवून, गुन्ह्याचे पुरावे दाखवल्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. दरम्यान सायबर पोलिसांनी या गुन्ह्यासाठी वापरलेले संगणक, कलर प्रिंटर, स्कॅनर आणि मोबाइल जप्त केले आहेत.






