तब्बल एक लाखाचे बिल पाठवून महावितरणने दिला नाथाभाऊंना शॉक

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – लॉकडाऊन दरम्यान सर्वांनाच महावितरणने ॲव्हरेज बिल पाठविले होते. मात्र लॉकडाऊननंतर आलेल्या वाढीव लाईटबिलांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले होते. कोरोनामुळे आर्थिक संकट कोसळलेले असताना वाढीव वीजबिलांनी अनेकांना झटका दिला आहे. या सर्व प्रकाराने सर्वसामान्य नागरिकच नाही तर सिनेअभिनेते, राजकीय नेत्यांनाही या वाढीव लाईटबिलांनी शॉक दिला आहे. मध्यंतरी प्रख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांनाही वाढीव लाईटबिल आल्याचे प्रकरण राज्यात गाजत होते.
दरम्यान, एकेकाळी आपल्या प्रभावी वत्कृत्वाने राज्यातील भल्याभल्या नेत्यांना घाम फोडणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही महावितरणने दिलेल्या वाढीव लाईटबिलाने घाम फोडला आहे. मुक्ताईनगर येथील घरासाठी तब्बल १ लाख ४ हजार रुपयांचे लाईटबिल नाथाभाऊंना आले आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांचे हे लाईटबिल आहे. लाईटबिल पाहून एकनाथराव खडसे यांनी आश्चर्य व्यक्त केले असून, याप्रकरणी चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
महावितरणने सामान्य ग्राहकांना वेठीस धरू नये आवाहनही नाथाभाऊंनी केले आहे. अवास्तव लाईटबिलांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, शासनाने या प्रकाराची गांभीर्याने चौकशी करून वाढ़ीव लाईटबिलात नागरिकांना सूट द्यावी अशी मागणी होत आहे. विरोधी पक्षाने देखील महाआघाडी सरकारला यावरून लक्ष्य केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here