ड्रायव्हरला डुलकी लागल्याने दोन ट्रकची समोरासमोर धडक; एक जखमी

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : अलिबाग रोहा रस्त्यावर शहराला लागून असलेल्या आरसीएफ कॉलनी येथे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात बर्फ घेऊन जाणारा ट्रक चालक जखमी झाला असून त्याच्यावर अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिबाग पोलिसांकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. अपघातामुळे दोन्ही बाजूला एक किलोमीटर पर्यत वाहनाच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली.

उसर येथून एचपी गॅस घेऊन ट्रक चालक हा पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अलिबागकडे येत होता. चालकाला डुलकी लागल्याने अलिबागकडून रोहाकडे जाणाऱ्या बर्फाच्या ट्रकला गॅसच्या ट्रक चालकाने चुकीच्या दिशेने येऊन धडक दिली. या अपघातात बर्फ घेऊन जाणारा ट्रक चालक हा जखमी झाला आहे.

अशा परिस्थितीत अपघात करणाऱ्या चालकाने जखमी चालकाला मारहाण करून पलायन केले आहे. जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले असून, वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. याबाबत चालकाविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here