पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या शिवणे, उत्तम नगर या गावांमध्ये अनधिकृत बांधकामांना पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची मूकसंमती असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पुणे महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. तोंडदेखली एखाद्या इमारतीवर कारवाई दाखवून मर्जीतील बांधकाम व्यावसायिकांना अभय देण्याचे प्रकार वाढल्याने अतिक्रमण विरोधी कारवायांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी पुणे नागरीक मंचने केली आहे.
पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्र लिहून मंचाने ही मागणी केली आहे. मंचातर्फे संदीप सूर्यवंशी, शत्रुघ्न सिंह यांनी ही मागणी केली आहे. शिवणे, उत्तम नगर येथे शासनाचा महसूल चोरी होण्याचे प्रमाण जास्त आहे. अनधिकृत बांधकामांमुळे नागरी वस्तीवर येणारा भार वाढतो आहे. यामुळे रस्ते पाणी वीज यासारख्या मूलभूत गोष्टींवर भार पडतो आहे. परंतु प्रशासनाचे या गोष्टींकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच की काय या भागातील अधिकाऱ्यांची या अनधिकृत बांधकामांमध्ये हात ओले झाल्याचा आरोप मंचाने केला आहे.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना दुजाभाव दाखवल्याचे चित्र स्पष्ट दिसते आहे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराचे उत्कृष्ट नमुने शिवणे उत्तम नगर या भागात बांधून तयार आहेत सदर बांधकामे होताना ३ सप्टेंबर रोजी कारवाई झाली, परंतू अधिकाऱ्यांच्या समोर बांधकामे चालू होती. परंतु दांगट पाटील नगर येथे स.नं.८५ येथे एकूण १०-१२ इमारती असताना एकाच इमारतीवर नावाला कारवाई केली. अधिकार्यांनी ठराविक एका इमारतीवर कारवाई करून शेजारील इतर अनधिकृत बांधकामांना अभय दिले आहे, हे शंकास्पद आहे. यामुळे भ्रष्ट अधिकारी पैसे घेऊन कारवाई करतात असे चित्र शिवणे उत्तम नगर भागात दिसते आहे.
अनेक सदनिका या अनधिकृत रित्या विकल्यामुळे ग्राहकांचीसुद्धा फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या अभद्र युतीमुळे असे अनधिकृत प्रकार फोफावत आहेत. या बांधकामांवर कारवाई झाली नाही तर पालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा मंचाने दिला आहे.






