पानिपत – हरियाणा (नंदपाल) : राज्यातील महेंद्रगडमध्ये एका १८ वर्षीय तरुणाला काही तरुणांनी अमानुषपणे लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आलाय, ज्यात काहीजण एका तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत.
ही घटना ९ ऑक्टोबरची असून, आज या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी महेंद्रगड पोलिसांनी ८ ते १० जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी विक्की उर्फ फुकरा याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांच्या रिमांडवर पाठवलंय.
याबाबत समजलेली माहिती अशी की, महेंद्रगड जिल्ह्यातील बवाना गावचा रहिवासी असलेला १८ वर्षीय गौरव यादव ९ ऑक्टोबर रोजी दुपारी महेंद्रगड येथून दुचाकीने घरी परतत होता. त्याला रवी, कॅप्टन, अजय आणि मोहनसह १० पेक्षा जास्त तरुणांनी वाटेत मालदा गावातील कालव्याजवळ अडवलं. यानंतर त्याला काही कळायच्या आत सर्वांनी त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी एक आरोपी या मारहाणीचा व्हिडिओ काढू लागला तर इतर काहीजण गौरवला मारू लागले. यावेळी गौरव हात जोडून दयेची भीक मागत राहिला, पण आरोपींनी दया दाखवली नाही. आरोपींनी गौरवला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. यानंतर सर्व आरोपींनी तेथून पळ काढला. या घटनेनंतर गौरवच्या नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं, पण त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी याच परिसरात गौरव आणि आरोपी रवी उर्फ लंगडा यांच्यात बाचाबाची झाली होती. त्याच गोष्टीचा राग मनात धरुन रवीने आपल्या साथीदारांसोबत गौरवला बेदम मारहाण केली. व्हायरल व्हिडीओमध्ये रवी अमानुषपणे मारहाण आणि शिवीगाळ करताना दिसत आहे. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी ३ वेगवेगळ्या टीम तयार केल्या आहेत.






