मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत बच्चे कंपनीसाठी गोष्टी, कविता, ललित लेख, कोडी, कार्टून्स यांचा खजिना उपलब्ध होणार आहे. मनोरंजक मजपूर आणि आकर्षक चित्रांनी नटलेल्या बालभारतीच्या ‘किशोर’ मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे पार पडले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, बालभारतीचे संचालक विवेक गोसावी, ‘किशोर’चे कार्यकारी संपादक किरण केंद्रे उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, त्यांना पाठय़पुस्तकाबाहेरील ज्ञान मिळावे, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांच्यावर उत्तम मूल्यसंस्कार व्हावेत या उद्देशाने मागील पन्नास वर्षे ‘बालभारती’च्या वतीने ‘किशोर’ हे मासिक प्रकाशित केले जाते. ‘किशोर’चा दिवाळी अंक हा नेहमीच आकर्षक आणि नावीन्यपूर्ण असतो. यंदाचा ‘किशोर’चा अंक बाल आणि किशोर या दोन्ही गटांतील मुलांसाठी रंजक, बोधप्रद आणि संस्कारक्षम असा आहे. मुलांच्या आकलनशक्तीचा अंदाज घेऊन अंकातील विषय आणि भाषाशैली निवडण्यात आली आहे.

या अंकात अनेक मान्यवरांनी लेखन केले आहे. त्यामध्ये ज्येष्ठ गीतकार आणि कवी गुलजार, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अनिल अवचट, महावीर जोंधळे, श्रीकांत बोजेवार, राजीव तांबे, प्रवीण दवणे, विजय पाडळकर, रेणू गावस्कर, वंदना भागवत, दासू वैद्य, संजय भास्कर जोशी, दीपा देशमुख यांचा समावेश आहे. या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ चित्रकार चंद्रमोहन यांनी चितारले आहे. या १३२ पानांच्या पूर्ण रंगीत दिवाळी अंकाची किंमत केवळ ७५ रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here