मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : कोरोनामुळे आर्थिक कुचंबणा सहन कराव्या लागणाऱया सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील कलाकारांना आर्थिक सहाय्य करण्याचा मोठा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. प्रयोगात्मक कलांवर उदरनिर्वाह असलेल्या ५६ हजार एकल कलावंतांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
राज्यातील ५६ हजार कलाकारांना आर्थिक मदत म्हणून २८ कोटी रुपये तर प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील ८४७ संस्थांना सहा कोटी रुपये असे एकूण रुपये ३४ कोटी आर्थिक सहाय्य देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
मदतीसाठी पात्र कलावंतांची निवड वृत्तपत्र आणि इतर माध्यमातून जाहिरातीद्वारे अर्ज मागवून करण्यात येईल. एकल कलावंत निवडीसाठी जिल्हाधिकारी स्तरावरील समिती कलावंतांची निवड करील. संस्थांची निवड सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या स्तरावरील समितीद्वारे करण्यात येईल. पात्र कलावंतांच्या बॅंक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येईल.






