सात वर्षानंतर फुटली अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराला वाचा; गुन्हा दाखल

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : अल्पवयीन मुलीवर तिच्या काकानेच धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची घटना तब्बल सात वर्षानंतर उघड झाली आहे. कल्याणमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांनी 64 वर्षीय वृद्धाला अटक केली आहे. दरम्यान याप्रकरणी कोणाला काही सांगितल्यास तिच्या छोट्या बहिणीवर देखील अत्याचार करण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळेच आजपर्यंत याबद्दल पीडित मुलगी काहीही बोलली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. आता या पीडित मुलीचे वय १४ वर्षं असून मागील सात वर्षापासून ती मानसिक तणावात होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सात वर्षांपूर्वी, २०१४ साली तिच्या आई वडिलांसोबत तिच्या सदर नातेवाईकाच्या घरी काही दिवसांकरीता राहण्यास गेली होती. तेव्हा आरोपी नातेवाईकाने त्या मुलीवर वारंवार लैगिंक अत्याचार केला होता. तसेच ही गोष्ट अन्य कोणाला सांगितल्यास लहाण बहिणीसोबत देखील लैंगिक अत्याचार करण्याची धमकी आरोपीने संबंधित मुलीला दिली होती. यामुळे पीडीत मुलगी सात वर्षापासून प्रचंड मानसिक दबावाखाली वावरत होती.

अखेर पुन्हा त्या नातेवाईकाकडे जाण्याची वेळ येताच तिने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. या प्रकारामुळे त्या मुलीच्या कुटुंबियांना धक्का बसला. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसात त्या नराधम काका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ६४ वर्षीय आरोपीला अटक केल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here