दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : शेतकरी आंदोलनाचे ठिकाण असलेल्या सिंघू बॉर्डरवरील अमानुष हत्याकांडाने एकच खळबळ उडाली असून देश हादरला आहे. हत्या करण्यात आलेल्या युवकाला १०० मीटरपर्यंत फरफटत नेण्यात आले, एक हात कापला गेला आणि मृतदेह संयुक्त किसान आंदोलनाच्या व्यासपीठासमोर बॅरिकेड्सला लटकवण्यात आला. हे हत्याकांड म्हणजे शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचेही म्हटले जात आहे. या युवकावर गुरु ग्रंथ साहिबची विटंबना केल्याचा आरोप आहे.
दिल्लीच्या बाहेर सिंघू सीमेवर पुंडलीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. तेथे शुक्रवारी पहाटे ५ वाजता बॅरिकेड्सला बांधलेला मृतदेह आढळला. या मृतदेहाचा एक हात कापला आहे. पाचही बोटांसह संपूर्ण तळवा कापून वेगळा करण्यात आला आहे. मानेवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खुणाही आहेत. या घटनेची माहिती मिळताच पुंडली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळावर येऊन मृतदेह खाली घेतला आणि शवविच्छेदनासाठी तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाला यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या हत्येमागे निहंग असल्याचा आरोप केलाय. निहंगा सुरुवातीपासून आम्हाला अडचणीत आणत आहेत. या घटनेशी किसान मोर्चाचा काही संबंध नाही. या हत्याकांडातील गुन्हेगारांविरोधात कारवाईसाठी हरयाणा सरकारला सहकार्य करण्यास आपली तयारी असल्याचे राजेवाला यांनी म्हटले आहे.






