भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमधील ऑनलाईन जुगारावर पोलिसांचा छापा; पोलिसांना धक्काबुक्की : सात जणांना अटक

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : भाड्याने फ्लॅट घेऊन त्यात ऑनलाईन जुगार अड्डा सुरु केला होता. पोलिसांनी तेथे छापा टाकला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे.

हा जुगार अड्डा चंद्रकुमार राकेश रुपवाणी (रा. रायपूर, छत्तीसगड) याच्या सांगण्यावरुन सुरु करण्यात आला होता. पोलिसांनी तेथून नारदमूनी नंदजी राम (वय ३०), जयकुमार कुंदन मेहता (वय १८), सतिश कृष्णा कन्सारी (वय २९), चिंटुकुमार रामस्वरुप गुप्ता (वय २९), विक्रम महादेव काळे (वय २२, रा. माळशिरस), दीपक अशोककुमार सहा (वय २६), हरिशकुमार जी बैरागी (वय २४) यांना अटक केली आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महादेव भानुदास येलमार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात ७७३/२१ नुसार फिर्याद दिली आहे. आरोपींनी हिंजवडी येथील फेज २ मधील हायमाऊट सोसायटीत फ्लॅट भाड्याने घेऊन सोसायटीच्या रहिवाशांना काहीही कल्पना न देता बेकायदेशीरपणे वास्तव्य करुन चंद्रकुमार रुपवाणी याच्या सांगण्यावरुन ऑनलाईन बेटिंगचे काम सुरु केले होते.

या ऑनलाईन जुगार अड्ड्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यांनी शुक्रवारी पहाटे सव्वा चार वाजता छापा टाकला. तेव्हा तेथे असलेल्यांनी त्यांना ढकलून देऊन सरकारी कामात अडथळा आणला. पोलिसांनी या फ्लॅटमधून १८ मोबाईल, २ लॅपटॉप, २ वायफाय राऊटर असा ४ लाख २२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक काटे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here