उल्हासनगरमध्ये ऑन ड्युटी पोलिसांवर चाकूने वार; दोघांची प्रकृती चिंताजनक

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : ऑन ड्युटी असणाऱ्या दोन पोलिसांवर काही जणांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. आरोपींनी चाकूने या पोलीसांवर वार केला असून यामध्ये पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाले आहेत. गणेश डमाले असे जखमी पोलीस अंमलदाराचे नाव असून ते विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यास आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा प्रकार गुरुवारी रात्री उशिरा उल्हासनगर शहराच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्शन 30 परिसरात घडली आहे. संबंधित दोन्ही पोलीस या परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, याठिकाणी दोन गटांमध्ये पैशावरून वाद होऊन एकमेकांवर जीवघेणा हल्ला करत होते. यावेळी गस्तीवर असणारे पोलीस अंमलदार गणेश डमाले आणि गणेश राठोड यांनी दोन्ही गटात मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतापलेल्या हल्लेखोरांनी डमाले आणि राठोड दोघांवरही चाकू हल्ला केला आहे.

संजय शितलानी आणि नरेश लेफ्टी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पैशावरून वाद होते. नरेश हा संजयकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. यामुळे अविनाश नायडू याने संजयकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.तसेच प्रकरण मिटवण्यासाठी संजय आणि अविनाश हे मध्यरात्री नरेशला भेटण्यासाठी सेक्शन 30 परिसरात आले. यावेळी दोन गटांत बाचाबाची झाली. यानंतर नरेशच्या टोळीने संजय आणि अविनाश या दोघांवर चाकूने वार केले.

गस्तीवर असणारे पोलीस अंमलदार गणेश डमाले आणि गणेश राठोड हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी भाडणं सोडवण्यासाठी प्रयत्न केला. कोणत्याही सरकारी शस्त्राशिवाय वाद मिटवण्यासाठी गेलेल्या या दोन्ही पोलिसांवर नरेशच्या टोळीने चाकू हल्ला केला. यावेळी आरोपींनी संजय शितलानी आणि अविनाश यांच्यावर देखील अनेक वार केले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असून दोघांना उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here