मैनपूरी (उत्तरप्रदेश) : परिसरातील औंच्छा भागात शनिवारी सकाळी एका महिलेची तिच्या दिराने फावड्याने खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण, तोपर्यंत आरोपी दीर तेथून पळून गेला होता. खूनामागे जमिनीचा वाद असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, औंच्छा परिसरातील दलीपपूर गावातील रहिवासी घेमडीलाल यांची पत्नी रामवती (वय-५०) शनिवारी सकाळी भात पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेली होती. रामवती दीर सर्वेश कुमारच्या शेतातील नाली साफ करत होती आणि ही गोष्ट दिराला आवडली नाही. तो वहिनीवर रागावला आणि त्याने वहिनीला साफ-सफाई करण्यास नकार दिला.
जेव्हा रामवतीने पिक सुकवण्याविषयी सांगितलं तेव्हा दीर तिच्याशी वाद घालू लागला आणि त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात सर्वेशने रामवतीवर फावड्याने हल्ला केला. या हल्ल्यात रामवतीचा जागीच मृत्यू झाला. खून केल्याल्यानंतर आरोपी सर्वेशने संधीचा फायदा घेत पळ ठोकला. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली आणि माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.






