मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : अत्याचारामुळे खचलेल्या महिला व बालकांना त्या आघातातून बाहेर काढण्यासाठी मुंबई पोलीस आता महत्त्वाचे पाऊल उचलत आहेत. अशा पीडितांना मानसिकदृष्टय़ा भक्कम करण्याबरोबरच त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी पोलीस शहरात ‘सक्षम प्रोजेक्ट’ सुरू करणार आहेत.
अत्याचारामुळे पीडितांच्या मनावर मोठा आघात होता. मानसिकदृष्टय़ा त्यांचे प्रचंड खच्चीकरण होते. याची गंभीर दखल मुंबई पोलिसांनी घेतली आहे. अशा अत्याचारग्रस्त पीडितांना पुन्हा सक्षम करण्यासाठी पोलीस शहरामध्ये महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट राबविणार आहेत. शहरातील पाच प्रादेशिक विभागांत पाच सेंटर उभारून हा प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. विक्रोळी येथे पहिले सेंटर उभारले असून लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या सेंटर्समध्ये मानसोपचार-तज्ञांकडून पीडितांचे काऊन्सिलिंग करून त्यांना आघातातून बाहेर काढण्याबरोबरच नव्याने आयुष्य जगण्याची उमेद दिली जाईल. तसेच अत्याचार करणाऱ्यालाही तेथे बोलावून त्याचे काऊन्सिलिंग केले जाईल. त्या माध्यमातून आरोपींमधील अपप्रवृत्ती दूर करून महिला व बालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला करण्याचा प्रयत्न करणार आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ‘सक्षम प्रोजेक्ट’ राबवला जाणार असून महिलांना नोकरी, व्यवसाय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या सर्व बाबींवर मुंबई पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. पीडित महिला व बालकांचे व्यवस्थित काऊन्सिलिंग होतेय का?. त्याचा त्यांना फायदा होतो का? या सर्व बाबी ‘निर्भया’ पथके पाहणार असल्याचे सांगण्यात आले.






