शिर्डी (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र साईनगरीत नगर-मनमाड महामार्गाचे काम नव्याने सुरू होण्यापूर्वी शिर्डी शहरातील राहाता तसेच कोपरगाव या दोन्ही बाजूंना शिवलगत स्वागत कमानी उभारण्यात यावी तसेच निमगाव हद्दीतील सद्य स्थितीत उभारण्यात आलेली स्वागत कमानीची पडझड झाली असून कोणत्याही क्षणी ती कोसळून अपघात घडू शकतो. यासाठी सदरची कमान तातडीने काढून नव्याने स्वागत कमानी बसवण्यात यावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला राहाता तालुका शिवसेनेचा उपाध्यक्ष अक्षय तळेकर यांनी केली आहे.
राहाता शिवसेनेच्यावतीने तालुका उपतालुका प्रमुख अक्षय तळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिर्डी शहरात साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे भाविक हे राहाता, साकुरी तसेच कोपरगाव, सावळीविहीर मार्गाने पालखी तसेच दिंडी घेऊन येत असतात. सध्या शहरात सुशोभीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. साईबाबांच्या पुण्यभुमीत शिर्डी शहरात प्रवेश करताना भाविकांच्या स्वागतासाठी स्वागत कमान असावी अशी शिर्डीसह असंख्य भाविकांची मागणी आहे. नगर मनमाड महामार्गासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
शताब्दी वर्षापुर्वी संस्थानच्या वतीने सदरील स्वागत कमानीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केला आहे. साईसमाधी शताब्दी वर्ष सरून गेले परंतु कमानीचा प्रश्न मार्गी लागला नाही. आता कोपरगाव ते नगर रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. रस्त्याची मोजमापे सुरू आहे. अशातच कमानीचा विषय मागे पडू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने याविषयी पुढाकार घेऊन स्वागत कमानी उभाराव्यात, असेही तळेकर यांनी म्हटले आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात शिर्डी निमगाव शिवेवर उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीची अवस्था बिकट झाली असून कोणत्याही क्षणी कमान कोसळू शकते. कमानीच्या पिलरला काही ठिकाणी तुटफुट झाली आहे. त्यामुळे यासारख्या हुबेहूब कमान दोन्ही बाजुला बसविण्यात याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.






