राष्ट्रवादी कॉंग्रेस जळगाव महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव शहर महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी यांची नियुक्ती करण्यात आलीय. आज राष्ट्रवादी कार्यालयात जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी याबाबत नियुक्तीचे पत्र त्यांना दिले.

अभिषेक पाटील यांच्यावर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या सूचना ऐकत नाहीत, त्यांना अंधारात ठेऊन निर्णय घेतात, अशा प्रकारच्या तक्रारी प्रदेश पातळीवर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अभिषेक पाटील यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या जागी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले अशोक लाडवंजारी यांच्या नावाची महानगराध्यक्ष पदासाठी जोरदार चर्चा अनेक दिवसापासून सुरु होती. खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर त्यांच्या समर्थकांच्या पुनर्वसनासाठी पक्षात अशाप्रकारे फेरबदल होत असल्याचे बोलले जात आहे.

अशोक लाडवंजारी हे खडसे यांचे निकटवर्तीय आहेत. आज पक्षकार्यालयात त्यांना जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी नियुक्तीपत्र दिले. यावेळी वाल्मिक पाटील, रवींद्र पाटील, योगेश देसले, मंगलाताई पाटील, अरविंद मानकरी, यांच्यासह आदि पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षाने दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू. पक्षवाढीसाठी पूर्ण प्रयत्न करू. तसेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जी संधी दिली, त्याबाबत मी शरद पवार साहेब, अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एकनाथराव खडसे यासह जिल्ह्यातील सर्व नेत्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया महानगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अशोक लाडवंजारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here