आजपासून राज्यात तिसरी घंटा खणाणणार; नाट्यगृहे, चित्रपटगृहे, अम्युझमेंट पार्क सुरु

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : आजपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह सुरु होणार आहेत. दरम्यान आजपासूनच अॅम्युझमेंट पार्कही खुली करण्यात येणार आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्य सरकारने काल शाळा, मंदिरे सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आजपासून म्हणजेच, २२ ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

आज शुक्रवार दिनांक २२ ऑक्टोबर सकाळी ७.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सुप्रसिद्ध दिग्दर्शक लेखक नागराज मंजुळे तसेच अनेक चित्रपट, नाट्य सृष्टीतील कलाकार यांच्या प्रमुख उपस्थितीत नटराज पूजनाचा आणि कलाकारांचा कला सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला कलाकार, तंत्रज्ञ आणि रंगभूमीवरील पडद्यामागील कलाकार उपस्थित होते.

गेले अनेक दिवस सिने-नाट्यगृहे कधी सुरु होणार अशी चर्चा सिने-नाट्यवर्तुळात होत होती. सिनेमाप्रेमीदेखील कधी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहता येईल याची वाट बघत होते. तर नाट्यप्रेमी त्यांच्या लाडक्या तिसऱ्या घंटेचा आवाज कानात कधी घुमणार याची प्रतिक्षा करत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात वर्षा बंगल्यावर थिएटर मालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळुन खुली करण्यास परवानगी देण्यात येईल. असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषित केले होते. टास्कफोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत चर्चा केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here