नगांव (आसाम) : तीन अल्पवयीन मुलांनी एका सहा वर्षाच्या चिमुकलीचा दगडाने ठेचून खून केला आहे. ही सहा वर्षीय मुलीला आरोपी मुलांनी मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला. पण ते व्हिडीओ बघण्यास तिने नकार दिल्याने संतापलेल्या आरोपी मुलांनी दगडाने ठेचून तिचा खून केला. खून करणाऱ्या आरोपी मुलांचे वय हे ८ ते ११ वर्षांच्या दरम्यान आहे.
ही घटना मंगळवारी (दि.१९) घडली. आरोपी तीन अल्पवयीन मुलं पीडितेला गोड बोलून घराजवळील दगडाच्या एका खदानीजवळ घेऊन गेले. तिथे त्यांनी पीडितेला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न केला. पण मुलीने व्हिडीओ पाहण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी तिचा दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह परिसरातील सार्वजनिक शौचालयात ठेवला. संबंधित प्रकार जेव्हा उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी तपास सुरु केला. पीडिता सर्वात शेवटी कुणासोबत बाहेर गेली होती, कुणी तिला शेवटी कसं बघितलं? या प्रश्नांचा शोध घेत असताना पोलीस अखेर आरोपींपर्यंत पोहोचले.
पोलिसांनी या प्रकरणी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीच्या पित्याला देखील बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केलं असता अल्पवयीन आरोपींची बालसुधारणगृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले.






