शेंदूर्णी येथे जामिनावर सुटलेल्या आरोपीचे जंगी स्वागत करत काढली मिरवणूक

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी गावात गंभीर गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या एका आरोपीच्या साथीदारांनी गावात जंगी स्वागत करत मिरवणूक काढली. ढोल-ताशांच्या गजरात आरोपीला फुलांचा हार घातल्यानंतर काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गावातून दुचाकींची रॅलीही काढली. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

अफसर खाटीक असे जामिनावर सुटलेल्या संशयित आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी शेंदूर्णी गावात गुन्हेगारीची घटना घडली होती. त्यात पोलिसांनी 8 जणांना अटक केली होती. त्यात अफसर खाटीक याचाही संशयित आरोपी म्हणून समावेश होता. त्याला नुकताच या गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर सुटका झाल्यावर तो गावात आला. तेव्हा त्याच्या साथीदारांनी गावात जंगी स्वागत करत त्याची मिरवणूक काढली. ‘भाई का वेलकम’ म्हणत ही मिरवणूक काढण्यात आली.

या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी माहिती देताना सांगितले की, अफसर खाटीक याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. नुकताच तो एका गुन्ह्यातून जामिनावर सुटला. त्यानंतर गावात त्याची विना परवानगी मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचे कृत्य निश्चितच चुकीचे आहे. त्याचा जामीन रद्द व्हावा म्हणून आम्ही अहवाल तयार करणार आहोत, असेही डॉ. मुंढे यांनी सांगितले.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here