बीड (प्रतिनिधी) : येथे छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही मुलगी १४ वर्षांची असून विष प्राशन करुन तिने आपलं जीव संपवण्याचा निर्णय घेतला. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत शिक्षण घेते. तिच्याच शाळेत शिक्षण घेणारा एक मुलगा वारंवार तिची छेड काढत असेल. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पीडित मुलीने याबाबत आपल्या कुटुंबाला सांगितले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी त्या मुलाला जाब विचारुन समजही दिली.
वारंवार होत असलेल्या या छेडछाडीला कंटाळून या १४ वर्षीय मुलीने शुक्रवारी विष प्राशन केले. या घटनेनंतर तिला उपचारासाठी बीडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने या प्रकरणात तिचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाहीये. या प्रकऱणी पिंपळनेर पोलीस अधिक तपास करत आहेत.






