ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : येथील कॅम्प नं-५ कुलदेवी मंदिरासमोरील पाच मजल्याच्या पारस इमारतीमधील पाचव्या मजल्याच्या बेडरूमचा स्लॅब चौथ्या मजल्यावर पडून राजा उर्फ आकाश पोपटानी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. समहापालिकेचे उपायुक्त अशोक नाईकवाडे, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून इमारतीतील सर्व राहिवाश्यांना बाहेर काढून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे.
कॅम्प नं-५ गांधी रोड कुलदेवी मंदिरासमोर पारस नावाची पाच मजली इमारत असून २५ वर्ष जुनी असलेली इमारत महापालिकेच्या धोकादायक यादीत नव्हती. शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास पाचव्या मजल्याचा प्लॅट नं-५०३ च्या बेडरूमचा स्लॅब चौथ्या मजल्यावर पडला. याघटनेने परिसरात एकच खळबळ उडून नागरिकांत पळापळ सुरू झाली.
शेजारील नागरिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी स्लॅब खाली दबलेल्या राजा उर्फ आकाश पोपटानी नावाच्या तरुणाला बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळल्याने सहा महिन्यांपूर्वी झालेल्या दोन घटनात १२ जणांचा मृत्यू झाला होता.






