कर्नाटक महामंडळाच्या बसमध्ये महिलेची प्रसूती

लोणंद (कर्नाटक) : येथील देवदुर्ग येथून पुणे येथे निघालेल्या महिलेची प्रवासदरम्यान प्रसूती झाली आहे. प्रसुतीनंतर ही महिला आणि तिच्या नवजात बाळाला नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेआहे. ही महिला आणि नवजात बाळाची तब्येत चांगली असल्याचे नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रातून सांगण्यात आले.

याबाबत प्रत्यक्षदर्शी सहप्रवाशांनी दिलेली माहिती अशी की, ज्योती सोमनाथ चव्हाण (वय २०) ही महिला पुणे येथील भोसरी येथे तिच्या पतीसह राहते. ती बाळंतपणासाठी कर्नाटकातील मानवी तालुक्यातील मुरामपूरतांडा येथे आपल्या माहेरी वडिलांकडे गेली होती. तेथील डॉक्टरांनी डिलिव्हरी सिझेरियन पद्धतीने करावी लागेल असे सांगितले होते. त्यामुळे पैशाअभावी तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे आणण्याच्या सल्ला तिच्या पुणे येथे राहणाऱ्या पतीने तिच्या वडिलांना दिला होता.

काल रात्री ही बस देवदुर्ग येथून पुण्याकडे रवाना झाली. यामधून ही महिला प्रवास करीत होती. त्यावेळी तिला प्रसव काळा सुरू झाल्या होत्या. आज दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान सातारा जिल्ह्यातील लोणंदच्या पुढे बस आल्यावर पाडेगावजवळ तिला जास्त त्रास होऊ लागल्याने बसमधील इतर महिलांनी पुढाकार घेऊन तिची प्रसुती केली. दरम्यान, बसचालकाने १०८ ला फोन करून रुग्णवाहिका बोलावली. यानंतर या महिलेला नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉ. समीक्षा कांबळे यांनी महिलेवर उपचार केले. त्यांना ज्योती साळवे, योगिता टिळेकर यानी मदत केली.

यावेळी कर्नाटक परिवहनचे चालक, वाहक व बसमधील प्रवाशांनी सहकार्य करून ही प्रसूती निर्धोकपणे पार पाडण्यास मदत केली. बसमधील सहप्रवाशी लक्ष्मी पवार, नागेश्वरी पवार, रिरेमा राठोड यांनी ही प्रसुती यशस्वी पणे पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here