कोपरी पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला खाडीत अडकलेल्या तरुणाचे प्राण

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : कोपरी परिसरातील खाडीच्या गाळात अडकलेल्या एका फिरस्त्याचे प्राण पोलिसांच्या तत्परतेमुळे सोमवारी वाचले. तुलसी प्रसाद (३५, रा. कोपरी) असे या तरुणाचे नाव आहे. काही अज्ञात लोक मागावर असल्याने आपण खाडीच्या झुडपात गेलो आणि अडकलो, असे त्याने ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला सांगितले आहे.

कोपरीतील मीठबंदर भागात २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास खाडीमध्ये एक व्यक्ती अडकल्याची माहिती कोपरी पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांमध्ये पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस हवालदार चंद्रकांत म्हस्के, राजेश आंब्रे आणि पोलीस शिपाई अतिश कोंडीलकर यांनी तत्काळ धाव घेत खाडीतील झुडूपामध्ये अर्धा किलोमीटर आत जाऊन तुलसी याला सुखरूप बाहेर काढले.

काही अज्ञात लोक मारण्यासाठी आल्यामुळे खाडीमध्ये उडी मारली. मात्र, त्यानंतर आत चिखलात अडकल्याचे त्याने पोलिसांपाठोपाठ आलेल्या ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here