सावनेर पोलिसांचा कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील डान्सबारवर छापा

नागपूर (उपसंपादक उमेश अबलनकर) : सावनेर पोलिसांनी कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील डान्सबारवर छापा टाकून नोकरासह चार जणांना ताब्यात घेतले. या ठिकाणी पाच बारबालाही आढळून आल्या.

या प्रकरणी पोलिसांनी मनीष ऊर्फ विक्की प्रेम नारायण जयस्वाल (वय ३२ रा. फ्रेण्ड्स कॉलनी), राहुल विकास रामटेके (वय ३० रा. मोहाडी जि.भंडारा), टिकेंद्र वधाराव सावजी (वय ३२ मूळ रा झारखंड) व रोहितकुमार सुरेश शाहू (वय २८ ) यांना ताब्यात घेतले आहे.

छापेवाड्यातील शिवम बारमध्ये डान्सबार सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांना मिळाली. मगर यांनी सावनेर पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती मुळूक, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, सतीश पाटील, उपनिरीक्षक प्रियंका गेडाम, राजेंद्र यादव, संजय शिंदे, मनीषा बंडीवार, विशाल इंगळे यांनी सापळा रचला. रविवारी रात्री पोलिसांनी शिवम बारमध्ये छापा टाकला.

यावेळी पाच तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत नृत्य करताना पोलिसांना आढळल्या. पोलिसांनी त्यांच्यासह नोकर व व्यवस्थापकाला ताब्यात घेतले. या बारमधून पोलिसांनी रोख रकमेसह सव्वा लाखाचे साहित्य जप्त केले. बारबाला मुंबईच्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here