डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून दोघांचा खून करणारा किलर पोलिसांच्या ताब्यात

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : रमन राघव, बियर मॅन उर्फ रविंद्र कंट्रोले, कुर्ला येथे लहान मुलीवर बलात्कार करून हत्येचे सत्र अशा सिरीयल किलिंग नंतर आता आणखी एक सायको किलर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या सायको किलरने केवळ १५ मिनिटांत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोघांच्या डोक्यात पेव्हर ब्लाॅक टाकून त्यांना ठार केले. २०१५ मध्येही या किलरने कुर्ला येथे एकाची दगडाने ठेचून हत्या केली होती. ओळख ना पाळख केवळ सहजच कुणालाही ठार करणाऱ्या या माथेफिरूने आणखीनही हत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भायखळा येथील फळ मार्केटच्या पदपथावर झोपलेल्या एका व्यक्तीची शनिवारी सायंकाळी पेव्हर ब्लाॅकने डोकं ठेचून हत्या करण्यात आली. जवळपास १५ मिनिटांत येथूनच पुढे जे. जे. मार्ग परिसरात अशाच प्रकारे पदपथावर झोपलेल्या आणखी एकाची पेव्हर ब्लाॅक ने हत्या करण्यात आली. लागोपाठ एकाच पध्दतीने दोघांची हत्या करण्यात आल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. गुन्हे पध्दतीवरून एकाच व्यक्तीने या हत्या करण्यात आल्याने पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांची झाडाझडती सुरु केली.

हत्या करण्यात आलेल्या व्यक्तींची ओळख पटत नसल्याने आरोपीला शोधण्यात अडचणी येत होत्या. जे. जे. मार्ग पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता भायखळा येथे लोकलने उतरलेला व्यक्ती या हत्या करताना दिसत आहे. मात्र रात्रीची वेळ असल्याने त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. फुटजेमध्ये हा व्यक्ती दक्षिण मुंबईच्या दिशेने येत असल्याने पोलिसांनी पायधुनी, मोहम्मद अली रोडचा परिसर पिंजून काढत पोलिस ठाण्याच्या जवळच पदपथावर वास्तव्य करणाऱ्या सुरेश शंकर गौडा (४०) याला अटक केली.

जे. जे. मार्ग पोलिसांनी पकडलेला सुरेश गौडा हा हत्या करण्यात आलेल्या दोघानाही ओळखत नाही. कशासाठी मारले असे विचारले असता तो सहजच मारले अशी काहीही उत्तरे देत आहे. पोलिसांनी त्याचा रेकॉर्ड तपासला असताना २०१५ मध्ये कुर्ला येथे पदपथावर झोपलेल्या व्यक्तीची गौडा याने दगडाने ठेचून हत्या केली. मात्र २०१६ मध्ये पुराव्यांअभावी तो तुरुंगातून बाहेर आला. आता पुन्हा हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गौडा सध्या तुरुंगात असून दुसऱ्या हत्येप्रकरणात भायखळा पोलिस त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here