पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र दोरड्यातील टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी केले गजाआड

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये २१ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास ५ जणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. आरोपींनी कॅशियर, बँकेच्या कर्मचारी व हजर असलेल्या ग्राहकांना पिस्तुलाचा धाक दाखवून बँकेतील ३२ लाख ५२ हजार ५६० रुपयांची रोकड आणि २ कोटी ४७ लाख २० हजार ३९० रुपये किंमतीचे ८२४ तोळे सोने असा एकूण २ कोटी ७९ लाख ७२ हजार ९५० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

या गुन्ह्यातील आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली होती. या प्रकरणी डॉलर उर्फ प्रविण सिताराम ओव्हळ (वय-२९ रा. वाळद, ता. खेड), अंकुश महादेव पाबळे (वय-२४ रा. कावळपिंपरी, ता. जुन्नर), धोंडीबा महादु जाधव (वय-२९ रा. निघोज कुंड, ता. पारनेर, जि. नगर), आदिनाथ मच्छिंद्र पठारे (वय-२५ रा. पठारवाडी, ता. पारनेर), विकास सुरेश गुंजाळ (वय-२० रा. टाकळी हाजी, ता. शिरुर) यांना अटक करण्यात आली आहे. डॉलर उर्फ प्रविण ओव्हाळ हा टोळी प्रमुख असून त्याला पारनेर तालुक्यातील निघोज येथून अटक केली. आरोपींकडून २ कोटी १९ लाख १५ हजार ३७० रुपये किंमतीचे ७ किलो ३२ तोळे दागिने आणि १८ लाख २७ हजार ५९० रुपये रोख (Cash) असा एकूण २ कोटी ३६ लाख ४२ हजार ९६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींनी बँकेवर दरोडा टाकण्यासाठी तीन महिन्यांपासून पुर्वतयारी केली होती. त्यासाठी टोळी प्रमुख ओव्हाळ याने मध्यप्रदेशातून तीन पिस्टल आणल्या होत्या. तसेच गुन्हा करण्यासाठी दोन वाहनांचा वापर करण्यात आला. त्यापैकी मॅटेलीक ग्रे रंगाची सियाज कार (एमएच ०५ सीएम १२९३) गुन्ह्यात वापरण्यासाठी तिचा रंग पांढरा करुन घेतला. गुन्हा केल्यानंतर पुन्हा रंग बदल्यासाठी मध्यप्रदेश येथे नेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरोडा टाकल्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी सियाज गाडीमधील मुद्देमाल बोलेनो (एमएच १४ एसएम ०७०७) मध्ये टाकून लंपास केला.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Police Inspector Ashok Shelke), सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, संदिप येळे, नेताजी गंधारे, पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार तुषार पंधारे, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजु मोमीन, दिपक साबळे, विक्रम तापकी, सचिन घाडगे, विजय कांचन, अजय घुले, अनिल काळे, रविराज कोकरे, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, गुरु जाधव अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, सहायक फौजदार विजय माळी, प्रकाश वाघमारे, काशीनाथ राजापुरे, मुकुंद कदम, प्रमोद नवले, प्रसन्न घाडगे, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, संदिप वारे, धिरज जाधव, मंगेश भगत, अमोल शेडगे, प्राण येवले, बाळासाहेब खडके, महिला पोलीस कॉन्स्टेबल पुनम गुंड, समाधान नाईकनवरे, दगडु विरकर यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here