बीड (प्रतिनिधी) : शहरातील बहिरवाडी शिवारामध्ये बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभाग आणि बीड ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरूवारी दुपारी छापा टाकला. या छाप्यात दारू तयार करणाऱ्या कारखान्यासह एक कोटीपेक्षा जास्त रूपयांचा माल जप्त करण्यात आला.
शहराजवळ असणाऱ्या बहिरवाडी शिवारात दारूचा कारखाना सुरू असून यात बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभाग आणि ग्रामीण पोलिसांना समजल्यानंतर पोलीस अधिकारी योगेश उबाळे यांच्या पथकाने गुरूवारी छापा टाकला.
या छाप्यात दारू निर्माण करणाऱ्या मशनरीसह बनावट देशी दारूचे ब्रॅन्ड सापडले. यात बॉबी, संत्रा, टँगो प्रेमियम, भिंगरी संत्रा असे चार ब्रॅन्ड उत्पादीत करण्यात येत होते. या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लेबल, रिकाम्या बाटल्या, कार्टुनने भरलेल्या बाटल्या, बाटल्या सिल करण्याची मशीन आणि एक कोटी रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारखाना चालवणारा युवक फरार झाला आहे.






