नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : शेतकरी आंदोलनामुळे गाझीपूर आणि टिकरी सीमांवर उभारलेले बॅरिकेड्स अखेर ११ महिन्यांनंतर हटवण्यात आले आहेत. आंदोलनासाठी रस्ते बंद ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत टिप्पणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दोन्ही सीमांवरील बॅरिकेड्स हटवण्याची कारवाई केली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
केंद्र सरकारच्या जाचक कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱयांचे मागील ११ महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. याचदरम्यान गाझीपूर आणि टिकरी सीमांवर बॅरिकेड्स उभारले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. या परिस्थितीची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन संतप्त निरीक्षणे नोंदवली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी बॅरिकेड्स आणि काटेरी तारा हटवून वाहतुकीचा प्रश्न दूर करण्याचे पाऊल उचलले.
शेतकरी आंदोलन स्थळांवरील बॅरिकेड्स हटवण्याच्या कारवाईनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. आता तर फक्त दिखाऊ अडथळे दूर झालेत, लवकरच तिन्ही कृषी कायदेही हटवले जातील, असे ट्विट राहुल यांनी केले. या ट्विटमध्ये त्यांनी ‘अन्नदाता सत्याग्रह झिंदाबाद’ असे लिहून शेतकऱयांचा कृषी कायद्यांविरोधातील लढा यशस्वी होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.






