पैशांसाठी दोन महिन्यांच्या मुलीला विकणाऱ्या आईला अटक

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : पैशांसाठी आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला विकणाऱ्या आईला नवी मुंबईतील कामोठे पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यासोबत एक स्त्री रोगतज्ज्ञ आणि अन्य तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. या महिलेचं नाव अमरीन बानो बदर बक्श असं आहे. तिच्यासोबत डॉ. संजय पाटील या स्त्रीरोग तज्ज्ञाला अटक करण्यात आली आहे. तसंच रजनी जाधव आणि रुख्सार शेख या दोन सहकाऱ्यांनाही बेड्या पडल्या आहेत.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अमरीनला चार मुलं आहेत. ती जेव्हा पाचव्यांदा गरोदर राहिली तेव्हा तिचा नवरा तिला आणि तिच्या मुलांना वाऱ्यावर टाकून फरार झाला. तिने गर्भपाताचा प्रयत्न केला मात्र, तो यशस्वी होऊ शकला नाही. अखेर तिने पाचव्या मुलीला जन्म दिला. पण, उत्पन्नाचं काहीही साधन नसल्याने तिने आपल्या दोन महिन्यांच्या नवजात मुलीला विकण्याचा निर्णय घेतला. त्या कामी तिची मदत करण्यासाठी डॉ. संजय पाटील हा देखील तयार झाला. पण, कामोठे पोलिसांना या व्यवहाराची खबर लागली.

त्यांनी मंथन पाटील या महिलेला मुलीची खरेदीदार म्हणून पाठवलं. सुमारे 4 लाखांत सौदा ठरला. यातील अडीच लाख रुपये संजय पाटील याला, एक लाख रुपये अमरीनला तर उर्वरित रक्कम ही रजनी आणि रुख्सार या दोघींना मध्यस्थ म्हणून मिळणार होती. पाटील याच्याशी त्याच्या दवाखान्यातच सौदा नक्की झाल्यानंतर अमरीनने मुलीला आणलं. त्याच वेळी मंथन यांनी पोलिसांना इशारा केला. पाटील याच्या दवाखान्याबाहेर सापळा लावून बसलेल्या कामोठे पोलिसांनी धाड टाकून पाटील आणि अमरीनला रंगेहात पकडलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here