सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : पोलीस भरतीत उंची वाढावी म्हणून केसांचा विग लावून पोलिसांना फसवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील शेवते येथे एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. प्रभुराम प्रकाश गुरव (३१) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवारी उमेदवारांची उंची, छाती मोजण्याचा टप्पा पार पडला. त्याची जबाबदारी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरठ यांच्याकडे होती. उंची मोजत असताना प्रभुराम गुरव याची उंची मोजली जात होती. त्याचे आजूबाजूचे केस कमी आणि मध्यभागीच उंच केस असल्याचे दिसून आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बहिरठ यांना संशय आल्याने त्यांनी त्याच्या केसात हात घातला. त्यावेळी त्याने घातलेला केसाचा विग उपसून निघाला. तत्पूर्वी, प्रभुराम गुरव या उमेदवाराची मूळ उंची १६३.७ सेंटिमीटर होती. त्यामुळे त्याने तोतयागिरी केल्याचे उघड झाल्याने त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक हणमंत बदोले तपास करीत आहेत.






