पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : बालेवाडी येथील पाटीलनगरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळला असून, या दुर्घटनेत ७ कामगार जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी रात्री पावणेदहा वाजता घडली. घटनेची माहिती संबंधितांनी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी अग्निशमन दलाला कळविली.
बालेवाडी येथील पाटीलनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरु होते. इमारतीला लागून पोडियम पार्किंगचे स्लॅब टाकण्यासाठी सांगाडा रचण्यात आला होता.शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा स्लॅब टाकण्याचे काम सुरु झाले.या ठिकाणी १८ कामगार काम करीत होते. रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास काम सुरु असतानाच हा संपूर्ण स्लॅब कोसळला. त्याखाली ७ कामगार अडकले होते.
स्लॅब कोसळल्यानंतर या कामगारांना तेथील लोकांनी बाहेर काढून वाकड येथील लाईफ लाईन हॉस्पिटलला नेले.सुदैवाने हे कामगार किरकोळ जखमी झाले असून, अग्निशमन दलाला या घटनेची खबर रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी मिळाली. माहिती मिळताच पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, त्यापूर्वी सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले होते. ही घटना बाहेर पडू नये, यासाठीच अग्निशमन दलाला कळविण्यात आले नसल्याचे समजते.






