अवंतिका एक्स्प्रेसमध्ये विवाहितेचा विनयभंग; तिघांना अटक

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : ‘अवंतिका’ एक्स्प्रेसमध्ये विवाहितेचा तिघांनी विनयभंग करत पतीला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी कुरिअर कंपनीत काम करणाऱ्या तिघांना अटक केली.

पीडित महिला पतीसोबत १० ऑक्टोबर रोजी मुंबईहून इंदूरला निघाली होती. त्यावेळी आरोपी बहादूरसिंग वाघेला (२८), नटवजी राजपूत (५५) आणि आनंद सोनी (३०) हे सर्व भुलेश्वर येथील रहिवासी पीडितेच्या विरुद्ध दिशेला असलेल्या सीटवर बसले होते. जीआरपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेस बोरिवली स्थानकावर रात्री १० वाजता थांबली होती. त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या आरोपींपैकी एकाने महिलेचा खांदा दाबला आणि इतरांनी तिच्यावर अश्लील शेरेबाजी सुरू केली. याचा विरोध तिच्या पतीने केल्यावर आरोपीने त्यालाही शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी डब्यातील इतर प्रवाशांना याबाबत सांगितले. दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ ऑक्टोबरला इंदूरला पोहोचल्यानंतर या जोडप्याने इंदूर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर ही तक्रार बोरिवली जीआरपीकडे वर्ग झाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला.

जीआरपीने रेल्वेकडून ज्या डब्यात ही घटना घडली त्या प्रवाशांची यादी मिळवली. त्यांनी अहमदाबादला जात असलेल्या पुरुषांना ओळखले आणि ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपी कुरिअर कंपनीत काम करतात आणि अनेकदा कामासाठी फिरत असतात. घटनेनंतर काही दिवसांनी ते मुंबईत परतले. तर इंदूरमधील महिलेचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here