सलग १३ तासाच्या चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अनिल देशमुख हे अज्ञातवासात होते. त्याचवेळी त्यांच्यावर १०० कोटी रुपयांचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हेही फरार आहेत. १०० कोटी रुपये वसुलीच्या प्रकरणाबरोबरच बदल्यांमध्ये पैसे घेतल्याचा आरोपही अनिल देशमुख यांच्यावर असून त्याबाबतही ईडी चौकशी करीत आहे.अनिल देशमुख यांना ईडीने ५ वेळा समन्स बजावले होते. तरीही ते चौकशीला हजर राहिले नाहीत.

गृहमंत्री असताना त्यांनी पोलिसांना दरमहा १०० कोटी रुपये वसुली करण्याचा आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी आरोप केला होता. यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा दावा करुन ईडीने अनिल देशमुख यांच्यावर २१ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या मुंबई, नागपूर व अन्य ठिकाणी अनेकदा छापे मारण्यात आले होते. त्यानंतर ते अज्ञातवासात गेले होते. अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.

सोमवारी दुपारी बारा वाजता अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात गेले. त्याअगोदर त्यांनी दोन व्हिडिओ ट्विट करुन परमबीरसिंह यांच्यावर आरोप करीत आपली बाजू मांडली होती. ईडीच्या अधिकार्‍यांकडून दुपारपासून अनिल देशमुख यांची चौकशी सुरु करण्यात आली. त्यानंतर ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार हे देशमुख यांच्या चौकशीसाठी दिल्लीहून मुंबईत दाखल झाले. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या अटकेच्या कारवाईला वेग आला. देशमुख यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे नकारार्थी देत आहेत. ते माहिती लपवित असल्याचा अधिकार्‍यांना संशय आहे. त्यामुळे ईडीने त्यांना अटक करण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्रीनंतर १च्या सुमारास त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीने जाहीर केले.

अनिल देशमुख यांना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात येईल. त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी आता कोठडीत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here