अमरावती (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : नीटच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याचे पाहून स्नेहल भारत कोरडे (वय २१ रा. गोपाल नगर) या तरुणीने मानसिक तणावात येऊन राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना २ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
स्नेहल ही मेडिकलला प्रवेश मिळावा, यासाठी धडपड करीत होती. ती दोन ते तीन वर्षांपासून नीटची परिक्षा देत होती. यंदा आपल्याला ५५० गुण मिळाले की, आपण मेडिकलला प्रवेश घेऊन असे स्वप्न तिने पाहिले होते. सप्टेंबर २०२१ मध्ये तिने नीटची परीक्षा दिली. २ नोव्हेंबर रोजी निटचा निकाल येणार होता. नीटचा निकाल लागल्यानंतर तीने तो स्वत: न पाहता आपल्या मैत्रिणीला पाहायला सांगितले. परंतु स्नेहलला यंदा २९२ गुणच मिळाले. ही बाब मैत्रीणीने सांगताच पुन्हा स्नेहलच्या पदरी निराशा पडली. कमी गुण मिळाल्याचे पाहून स्नेहल मानसिक तणावात आली.
२ नोव्हेबर रोजी नीटचा निकाल कळल्यानंतर स्नेहल घरी पोहोचली. त्यावेळी तिचे वडिल भारत कोरडे यांनी स्नेहलला निकालबद्दल विचारणा केली. परंतु निकाल यायचा आहे, असे स्नेहलने वडिलांना सांगितले. त्यानंतर स्नेहल आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. बऱ्याच वेळापर्यंत ती बाहेर परतली नाही. त्यामुळे स्नेहलची बहिण तिला बोलाविण्यासाठी गेली. बाथरूममधून काही आवाज आवाज आला नाही, म्हणून बहिणीने दारातून आत पाहिले. त्यावेळी स्नेहलने शॉवरच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. बहिणीने ओरडाओरड करताच तिचे कुटुंबीय बाथरूमकडे धावून गेले. त्यांनी स्नेहलला गळफासावरून काढून तत्काळ रिम्स हॉस्पीटलला उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान स्नेहलचा मृत्यू झाला. या घटनेच्या माहितीवरून राजापेठ पोलिसांनी चौकशी करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.






