चार वेळा गोल्ड मेडल मिळविणाऱ्या ‘टिंकू’च्या निधनाने सातारा जिल्हा पोलीस दल हळहळले

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : जिल्हा पोलीस दलातील पहिला श्वान अशी ख्याती असलेल्या ‘टिंकू डॉग’चे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्याने २५ विविध गुन्हे उघडकीस आणले असून, ४ वेळा त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत गोल्ड मेडलचा किताब प्रदान करण्यात आला आहे. दरम्यान, त्याच्या जाण्याने सातारा पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

सातारा जिल्हा पोलीस दलात २००८ साली डॉग स्कॉड स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार श्वान शोधत असताना कोल्हापूर जिल्ह्यातून डॉबरमॅन जातीचा श्वान खरेदी करण्यात आला. याला सातारा पोलीस दलाने ‘टिंकू’ असे नाव दिले. नुकतेच जन्मलेले पिल्लू साताऱ्य़ात आणल्यानंतर त्याला वर्षभर घडलेल्या क्राईमचे डिटेक्शन करण्याबाबतचे ट्रेनिंग देण्यात आले. ट्रेनिंग कालावधी पूर्ण झाल्यानंतर या ‘टिंकू’ने पोलीस दलात काम केले.

टिंकूने आतापर्यंत २५ गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मदत केली आहे. महाराष्ट्रातील ही त्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी ठरलेली आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस दलाच्या विविध स्पर्धा असतात. यामधील महाराष्ट्र स्टेट पोलीस डय़ुटी मीट (एमएसपीडीएम) ही राज्यस्तरीय स्पर्धा असून, टिंकूने या स्पर्धेत ४ वेळा गोल्ड मेडल मिळवले आहे. तसेच पोलीस दलाची ‘ऑल इंडिया’ स्पर्धा होत असून, टिंकू पाच वेळा त्यामध्ये सहभागी झाला होता. दरम्यान, सातारा जिल्ह्यात डॉग स्कॉडचे अनेक डेमो होत असतात, तसेच विविध घटनेनंतर कॉल येत असताना टिंकूने ५०० हून अधिक डेमो व कॉल ऍटेंड केले आहेत.

टिंकू गतवर्षी पोलीस दलातून निवृत्त झाला. त्याची १२ वर्षे पोलीस दलात सेवा झाली होती. महाराष्ट्र पोलीस दलात एवढी सेवा अद्याप कोणत्याही श्वानाने बजावलेली नाही. महाराष्ट्र पोलीस दलात सर्वाधिक सेवा देणारा श्वान अशी रेकॉडब्रेक कर्तबगारी त्याच्याच नावावर आहे. राहुल आमणे व गजानन मोरे हे पोलीस हवालदार टिंकूचे हॅण्डलर होते. निवृत्तीनंतर आमणे हे त्याचा सांभाळ करत होते. सोमवारी त्याच्या जाण्याने डॉग स्कॉडच्या वतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here