ऐन दिवाळीत तेरखेडामध्ये सशस्त्र दरोडा

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे दिवाळीच्या पहिल्या दिवशी सशस्त्र दरोडा टाकून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. सतत पडणाऱ्या दरोड्यांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तेरखेडा येथे चार ठिकाणी चार सशस्त्र चोरट्यांनी फटाका व्यावसायिक सद्दाम पठाण यांच्या घरातील पाठीमागच्या बाजूस असलेल्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरटय़ानी किचनमध्ये डब्यात ठेवलेली सात लाख रुपये रोकड चोरली. त्यानंतर ते अर्जुन शिंदे यांच्या घराकडे वळले. मात्र, तिथे त्यांना कोणताही ऐवज सापडला नाही. त्यामुळे चोरटे शिवाजी सावंत यांच्या घराची मुख्य दरवाजाची कडी तोडून देवघरामध्ये असलेली दोन हजार रुपयांची रक्कम चोरली. घरातील मंडळींना घरात कोणीतरी शिरले आहे याची चाहूल लागताच जागे झाल्याने चोरटय़ानी त्या ठिकाणाहून धूम ठोकली. चोरटय़ांचा पाठलाग करत असताना प्रतिकार म्हणून काही चोरटय़ांनी सावंत यांना दगड फेकून मारले आणि शेजारील तारेच्या कंपाऊंडवरून उडय़ा मारत पलायन केले.

चोरटे ३.३० वाजण्याच्या सुमारास जनहित वसाहतीमध्ये रमा मिलजवळ राहत असलेल्या सेवानिवृत्त सैनिक बळीराम माने यांच्या घराकडे वळले. त्यांच्या घराचे चॅनल गेटचे कुलूप कटरच्या सहाय्याने तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर घरातील एका खोलीत प्रवेश करून कपाटातील सामान अस्ताव्यस्त करत कपाटातील एक लाख रोख रक्कम ठेवलेली बॅग चोरली. चोरटय़ांचा हा प्रकार सुरू असताना त्याच खोलीमध्ये बळीराम माने यांच्या आईला जाग आली. त्यामुळे चोरटय़ांनी त्यांना मारहाण केल्याने त्यांच्या खांद्यावर जखम झाली. त्यांनंतर चोरटय़ांनी दुसऱ्या खोलीला बाहेरून कडी लावत एक खोलीमध्ये झोपलेल्या माने यांच्या मुलाच्या खोलीच्या दारावर चोरटय़ांनी थाप मारून त्यांना उठवले व अजय माने यांनी दार उघडताच चोरटय़ांनी त्यांना पकडले. अजय माने यांनी प्रतिकार करत असताना एक चोरटय़ाने माने यांच्या उजव्या हातावर चाकूने वार केले. चाकूने वार केल्याने त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. त्या झटापटीमध्ये माने यांच्या पत्नीच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे गंठण हिसकावले. घरातील मंडळींनी आरडाओरडा केला असता चोरटे घरातून पसार झाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

गेल्या वर्षी ऐन दिवाळीमध्ये गावातीलच किराणा व्यावसायिक शंकर वराळे यांच्या घरी चोरटय़ांनी अशाच प्रकारे सशस्त्र दरोडा घालत रोख रक्कम व सोने लुटत लाखोंचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता. मात्र त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही दरोडेखोर मोकाट असल्याने सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर सवाल उपस्थित होत आहेत. गावामध्ये सीसीटीव्ही असता तर आम्हाला अधिक वेगाने तपास करण्यास मदत झाली असती अशी माहिती येरमाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक मोदे ह्यांनी सांगितले. या दरोडय़ाची गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया दुपारपर्यंत सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here