अहमदनगर (प्रतिनिधी) : येथील जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये लागलेल्या भीषण आगीत ११ रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. राज्यभरात सर्वजण आनंदाने भाऊबीज साजरी करीत असतानाच येथील रुग्णांच्या नातलगांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला. आग लागलेल्या वॉर्डमध्ये एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. यातील सहा जण सुदैवाने बचावले. आयसीयूत शॉर्टसर्किट झाल्याने आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सकाळी १० वाजताच्या सुमारास आयसीयू वॉर्डमधील एका एसीमध्ये आगीची ठिणगी पडली. आग वेगाने भडकत असल्यामुळे बचावकार्यादरम्यान ऑक्सिजन पुरवठाही बंद करण्यात आला. त्यामुळेही काही रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर काही रुग्ण धुरामुळे गुदमरून मृत पावले असावेत अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यासह संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे यावेळी
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. मृतांच्या परिवाराला आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आगीतमुळे इतर रुग्णांना रुग्णालयातील इतर ठिकाणी सुरक्षितरीत्या हलवण्यात आले आहे. दरम्यान, नगरच्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी शोक आणि सहवेदना व्यक्त केल्या आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीदेखील दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना मृतांच्या वारसांना सरकार आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्वासन दिले आहे.
नगरच्या जिल्हा रुग्णालयातील कोविडच्या अतिदक्षता विभागात लागलेली आग पंतप्रधान निधीतून मिळालेल्या व्हेंटिलेटरमध्ये स्पार्क होऊन लागल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. कोविड काळात रुग्णालयांना व्हेंटिलेटर मिळाले होते. हे व्हेंटिलेटर निपृष्ट दर्जाचे होते. त्यातूनच ही आग लागल्याची शक्यताही आमदार पवार यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नगरच्या आग दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवाय दोषींवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.
Maharashtra | A total of 10 people died in a fire incident at Ahmednagar District Hospital, said District Collector Rajendra Bhosale pic.twitter.com/zrUnAMKNMj
— ANI (@ANI) November 6, 2021
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नगर आग दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. रुग्णालयातील आगीची घटना दुर्दैवी असून या घटनेच्या उच्चस्तरीय सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून दोषी आढळणाऱयांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना तत्काळ देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
नगर आग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. या दुर्घटनेची चौकशी करून आठवडाभराच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशही टोपे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डामध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणाला जबाबदार असणाऱयांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयातील आगीची दुर्घटना कळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच मुख्य सचिव सीताराम पुंटे यांच्याशी बोलून सध्या रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.






