मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘ईडी’ कोठडीची मागणी फेटाळून लावत सत्र न्यायालयाने आज त्यांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ईडीने देशमुख यांना आणखी ९ दिवसांची ईडी कोठडी देण्याची मागणी केली होती.
शंभर कोटी वसुली प्रकरणात देशमुख यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी त्यांना सोमवारी मध्यरात्री अटक केल्यानंतर मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. विशेष म्हणजे सुनावणीदरम्यान पत्रकारांना न्यायालयात प्रवेश देण्यात आला नव्हता.
ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. तर देशमुखांच्या वकिलांनीदेखील जामिनासाठी युक्तिवाद केला. युक्तिवादादरम्यान ईडीने देशमुखांच्या ९ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. तेव्हा देशमुखांच्या वकिलांनी ९ दिवसांच्या ईडी कोठडीला विरोध केला.
गेल्या पाच दिवसांपासून देशमुख हे ईडीच्या कोठडीत आहेत. कोठडीदरम्यान ईडीने नवीन काहीच तपास केलेला नाही. तसेच कोठडी वाढवून मागण्यासाठी नवीन काहीच कारणे सांगितलेली नाही, असा युक्तिवाद वकिलांनी केला. देशमुखांचा मुलगा ऋषिकेशने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. सत्र न्यायालयाने ईडी कोठडीची मागणी फेटाळल्याने हा ‘ईडी’साठी धक्का आणि देशमुखांसाठी दिलासा मानला जातो. कारण त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने ते आता जामिनासाठी अर्ज करू शकतात.






