पगाराच्या वादातून मालकाच्या मुलाचे अपहरण

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : चेंबूरच्या एका व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या मजुराने मालकाच्याच चार वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना कुर्ला नेहरूनगर येथे घडली. मुलाला नाशिकला घेऊन पळालेल्या या मजुराला पोलिसांनी १२ तासांत शोधून त्याच्या तावडीतून मुलाची सुखरूप सुटका केली आहे. काम सोडल्यानंतर पुरेसा मोबदला न दिल्यामुळे रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

इंद्रचंद्र बालोटिया हे व्यावसायिक चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीत आपल्या कटुंबीयांसोबत राहतात. रामपाल तिवारी हा तरुण बालोटिया यांच्याकडे कामाला होता. वारंवार समजावूनही रामपाल दारू पिऊन कामावर येत असल्यामुळे इंद्रचंद्र यांनी त्याला कामावरून काढले. सोमवारी पगाराचे पैसे मागण्यासाठी तो इंद्रचंद्र यांच्याकडे आला होता. इंद्रचंद्र यांनी त्याला पगाराचे पैसे दिले; मात्र त्याने आणखी ५० हजार रुपयांची मागणी केली. बालोटिया यांनी आणखी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर रामपाल तेथून निघून गेला आणि सायंकाळी दारू पिऊन पुन्हा आला.

जवळपास कुणी नसल्याचे पाहून त्याने बालोटिया यांच्या चार वर्षांच्या मुलाला घेऊन तो पसार झाला. मुलगा दिसत नसल्याने बालोटिया यांनी आजुबाजूचा परिसर पिंजून काढला. त्याचवेळी रामपाल मुलाला घेऊन गेल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितल्यावर त्यांनी नेहरूनगर पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला व त्याची सुखरूप सुटका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here