घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार; गुन्हे शाखेच्या छाप्यात साडेआठ लाखांचा ऐवज जप्त

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा सुरू असलेला लाखोंचा काळाबाजार गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. घरगुती वापरातील गॅस सिलिंडरचा उपयोग रिक्षामध्ये किंवा इतर वाहनात भरत असताना ही कारवाई केली आहे. यामध्ये एकूण आठ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या छाप्यात आठ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घरगुती वापरातील गॅस सिलिंडर काळाबाजारात विकणाऱया प्रमुख आरोपींवर कारवाई होणार की नाही? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण ऐन दिवाळीत घरगुती वापरातील गॅस सिलिंडर काळाबाजारात विकल्याने सोलापुरात गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता.

जीवनावश्यक वस्तूंच्या काळाबाजारासह शहरातील अवैध धद्यांवर कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त हरीश बैजल व उपायुक्त बापू बांगर यांनी दिले होते. त्या अनुषंगाने शहर पोलीस आणि गुन्हे शाखेने सोलापुरात अवैध धंदेवाल्यांवर बारीक नजर ठेवली आहे. सोलापूर शहरातील प्रभाकर महाराज मठाजवळ जवळकरवस्तीच्या सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला एका पत्र्याच्या खोलीत घरगुती गॅस सिलिंडरचा साठा करण्यात आला असून, हा गॅस अवैधरीत्या रिक्षा व इतर वाहनांमध्ये भरला जात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली होती. यानंतर पथकाने या ठिकाणी छापा टाकला. यावेळी संगरत्न निजलिंगआप्पा इंगळे (रा. बुधकार पेठ, सोलापूर), महेश बाबासाहेब कांबळे हे वाहनांमध्ये गॅस भरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांच्यासह इतर सहा अशा आठ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १७ गॅस सिलिंडर, सात रिक्षा, आठ इलेक्ट्रिक वजनकाटे, रिक्षात गॅस भरण्यासाठी वापरलेली इलेक्ट्रिक मोटार व इतर साहित्य असे एकूण आठ लाख ४१ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप शिंदे, अजय पाडवी, तात्या पाटील, अजिंक्य माने, कुमार शेळके, गणेश शिंदे, राजकुमार पवार व निलोफर तांबोळी, संजय काकडे, ढेकणे यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here