मुंबईत खासगी कोचिंग क्लासेस करतायत पालकांची लुटालूट ?
सुवर्णरत्न फाऊंडेशन करणार मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार
संदिप कसालकर
मुंबईत सध्या कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यात मुंबईकरांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊन मुळे नोकरी, व्यवसाय हे पूर्णतः ठप्प होते. आता कुठे अनलॉक 1 ची सुरुवात झाली आहे.
त्यात अनलॉक मुळे कोरोनाचे संक्रमण सुद्धा वाढीस लागले आहे.
या सर्व संकटात मुंबईकरांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यात पालकांना आपल्या पाल्यांच्या शिक्षणाला लागणारा अवाढव्य खर्च हा कसा पेलवायचा हा प्रश्न सध्या ऐरणीवर उभा आहे.
शाळेचा खर्च तर आहेच पण सोबत खासगी क्लासेस ला लागणारा खर्च कसा करायचा हा प्रश्न सध्या प्रत्येक पालकाला पडलाय. बाकी शहरांच्या तुलनेने मुंबईत महागाई सुद्धा बऱ्याच प्रमाणात आहे. त्यात पगाराच्या तुलनेने खर्च हा डबल त्यामुळे मुंबईकर हे अक्षरशः त्रासले आहेत.
मुंबईत हजारोंच्या संख्येने खासगी क्लासेस आहेत. या मधील काही क्लासेस च्या फिस तर लाखोंच्या घरात आहेत. पण आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देता यावे तसेच ते हुशार व्हावेत यासाठी पालक हे कसलाही विचार न करता आपली आयुष्यभराची कमाई या खासगी क्लासेस मध्ये भरतात तर काही पालक हे कर्जबाजारी सुद्धा होतात.
एकंदरीत पाहिलं तर मुंबईत खासगी क्लासेस च्या नावाने पालकांकडून पैसे उकळण्याचा जणू काही काळा बाजारच चालला आहे. अश्या खासगी क्लासेस वर सरकार दुर्लक्ष करत आहे का ? अश्या या खासगी क्लासेस वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी तात्काळ निर्बंध टाकायला हवेत तसेच संपूर्ण महाराष्ट्रात क्लासेस ला घेऊन एकच नियम एकच कायदा हा अंमलात आणायला हवा तेही पालकांना परवडण्यासारखे असे सुवर्णरत्न फाऊंडेशन च्या मुंबई अध्यक्षा प्रीती पवार व मुंबई समन्वयीका श्रद्धा कसालकर यांनी म्हटले आहे.






