ऊस आंदोलनाचा भडका; राजारामबापू, क्रांती, विश्वास कारखान्यांची वाहने पेटवली

सांगली (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : जिल्ह्यात एक रकमी एफआरपी मिळावी यासाठी सुरु असलेले आंदोलन हिंसक वळणावर पोहोचले आहे. स्वाभिमानीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री ऊस वाहतूक करणारे राजारामबापू, क्रांती या कारखान्याचे ट्रॅक्टर पेटवले. विश्वास कारखान्याच्या ट्रॅक्टर पेटविण्याचा प्रयत्न झाला.

स्वाभिमानी शेतकरी संघटना एक रकमी एफआरपी मिळावी यासाठी आक्रमक झाली असून पालकमंत्री जयंत पाटील यांचा राजारामबापू, आमदार मानसिंगराव नाईक यांचा विश्वास, आमदार अरुण लाड यांचा क्रांती कारखान्याला त्यांनी लक्ष केले आहे.

राजारामबापू कारखान्याकडे निघालेला ट्रॅक्टर वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे पेटविण्यात आला. गुरुवारी रात्री क्रांती कारखान्याचा ट्रॅक्टर कडेगाव तालुक्यात बळवडी फाटा येथे पेटविण्यात आला. विश्वास कारखान्याचा ट्रॅक्टरही तांदुळवाडी येथेच पेटविण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी मिळावी अशी मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एक रकमी एफआरपी जाहीर केली आहे. मात्र सांगली जिल्ह्यात दत्त इंडिया आणि दालमिया या दोन कारखान्यांनी एक रकमी एफआरपी जाहीर केली आहे. अन्य दोन कारखाने जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. बुधवारी राजाराम बापू कारखान्याच्या ३५ वाहनाची हवा सोडण्यात आली यापूर्वी तासगाव तालुक्यात कुमठे फाटा, कडेगाव तालुक्यात रामपूर फाटा याठिकाणी वाहनाची हवा सोडून वाहतूक बंद पाडली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here